स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांचे एन.एम.एम.एस. परीक्षेत सुयश
देवलापार - शासनामार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या एन.एम.एम.एस. परीक्षेत स्थानिक स्वामी विवेकानंद विद्यालयातील एकूण पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात साक्षी जयराम यादव, सना सदवली कुमारी, अवनी राजू कूमरे, पलक अर्जुन वरठी व अंश किशोर बिंझाडे यांचा समावेश आहे. त्यांच्या या यशाबद्दल परिसरात विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक होत आहे.
एन.एम. एम. एस. ही राष्ट्रीय स्तरावरील शालेय विद्यार्थी इ ८ वी मध्ये शिकत असलेल्या मुलांसाठी केंद्र शासनाने सुरु केलेली शिष्यवृत्ती योजना आहे. त्यालाच मराठी मध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा असे म्हणतात.
इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करणे गरजेचे आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत प्रतिवर्षी 12000 प्रमाणे एकूण चार वर्षात 48000 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी, आणि आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परिक्षेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी शिक्षक सुनील वेळेकर, केतन कामडी, राजू बोंद्रे व भूपेश वरखडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक जयंत देशपांडे, पर्यवेक्षिका रेणुका देशपांडे, सर्व शिक्षकांनी व पालकांनी अभिनंदन केले आहे.


Comments
Post a Comment