कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाच्या शाळांना सूचना
इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी बोर्डाने कडक पावले उचलत यापुढे प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असायलाच हवे तसेच वीजपुरवठा खंडित झाला तर जनरेटरची सोय असायला हवी. याशिवाय सीसीटीव्हीचे फुटेज निकाल लागेपर्यंत जतन करून ठेवावे, केंद्रावरील गैरप्रकाराची तक्रार प्राप्त झाल्यानंतर बोर्डाकडून पडताळणी होईल आणि त्यानुसार संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाईल अशा सूचना बोर्डाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत.
बोडनि यापूर्वीच सरमिसळ पद्धतीचा अवलंब केला आहे. तरीदेखील मागच्या परीक्षेत विभागातील अनेक केंद्रांवर कॉपी करण्याचे प्रकार आढळले. केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे व वीज खंडित झाल्यास जनरेटर असत्याचे लेखी स्वरूपात दिले जायचे. परंतु प्रत्यक्षात काहीच नसायचे ही वस्तुस्थिती होती. मात्र, आता शासनाने यासंदर्भातील आदेश काढला असून प्रत्येक शाळेत विशेषतः बोर्ड परीक्षेच्या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले आहेत. नुसतेच सीसीटीव्ही कॅमेरे असून चालणार नाही, तर त्यांचे फुटेज ठेवण्याची सोय आवश्यक आहे. परीक्षा संपून निकाल लागेपर्यंत हे फुटेज संबंधित केंद्र चालकांना जतन करून ठेवावे लागणार आहे.
दरम्यान, बोर्डाच्या सुमारे साडेचार हजार केंद्रांच्या परिसरात व प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही आहे का, वीज खंडित झाली तर जनरेटर किंवा अन्य पर्याय आहे का ? मुबलक पाणी व इतर सोईसुविधा आहेत की नाहीत ? याची पडताळणी केली जाणार आहे. त्याचा अहवाल नागपूर बोर्डाला सादर करण्याचे आदेश सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
Comments
Post a Comment