इस्त्रोची अंतरिक्ष महायात्रा स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथे 14 मार्चला
देवलापार:-- भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो व विदर्भ विज्ञान भारती मंडळ नागपूर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरिक्ष महायात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. ही महायात्रा देवलापार येथील स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 14 मार्चला सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सकाळी साडेसात ते पाच वाजेपर्यंत खुली राहणार आहे. सदर अंतरिक्ष महायात्रा अंतर्गत स्पेस ओन व्हील्स ही प्रदर्शनी विदर्भातील बारा जिल्ह्यात येत आहे.स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात या प्रदर्शनेचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे यामध्ये वर्ग सहा ते आठ आणि नऊ ते बारा असे दोन गट केले असून ही स्पर्धा इस्त्रो याच विषयावर आयोजित करण्यात आली असून दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकांना इस्त्रोतर्फे प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात येणार आहे. देवलापार या आदिवासीबहुल भागात स्वामी विवेकानंद विद्यालय हे शिक्षण क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट असे काम करणारे विद्यालय रामटेक तहसील मध्ये नावाजलेले आहे.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये या विद्यालयाला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळालेला आहे. या विद्यालयांमध्ये अटल टिंकरिंग लॅब प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा असून दरवर्षी या शाळेतील विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनी मध्ये अतिशय उत्तम कामगिरी करत असतात, यावर्षी राज्य विज्ञान प्रदर्शनी मध्ये विद्यालयाला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे दोन पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यामुळेच ही अंतरिक्ष महायात्रा फक्त तालुकास्तरावरच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत असताना स्वामी विवेकानंद विद्यालयाचे शैक्षणिक योगदान ओळखून देवलापार येथे येत आहे. यानिमित्ताने इस्त्रो बसमधील अंतराळ उपक्रम व मॉडेल्स पाहण्याची संधी परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो विषयी माहिती व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती निर्माण व्हावी,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत संशोधनाचे महत्त्व समजावे या उदात्त हेतूने या प्रदर्शनीचे आयोजन केले आहे.या उपक्रमाचे संयोजक विध्यालायतील जेष्ठ शिक्षक राजू बोन्द्रे व सहसंयोजक प्रकाश धोटे हे आहेत. देवलापार परिसरातील आजूबाजूच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीमध्ये उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ गराट व पर्यवेक्षक जयंत देशपांडे यांनी केले आहे
Comments
Post a Comment